प्रेक्षणीय स्थळ
श्री रामेश्वर मंदिराचा इतिहास (मौजे उमराणे, ता. देवळा, जि. नाशिक)
मौजे उमराणे ता. देवळा, जि. नाशिक येथील श्री रामेश्वर मंदिर हे एक पुरातन आणि ऐतिहासिक मंदिर आहे. असे सांगितले जाते की उमराणे परिसर हा इतिहासपूर्व काळात दंडकारण्याचा भाग होता.
भगवान श्रीराम जेव्हा १४ वर्षांच्या वनवासात होते, तेव्हा पंचवटीकडे जाताना त्यांनी या परिसरात काही काळ वास्तव्य केले होते. त्या काळात प्रभू श्रीराम दररोज नित्यनियमाने वालुकामय (वाळूतील) शिवलिंगाची पूजा करत असत. या ठिकाणी त्यांनीच स्वतः शिवलिंगाची स्थापना केली, त्यामुळे त्याला “श्री रामेश्वर” असे नाव प्राप्त झाले.
श्री रामेश्वर हे स्वयंभू वालुकामय शिवलिंग असून ते जमिनीपासून सुमारे ७ ते ८ फूट खोल जागेवर स्थापित आहे. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी कलेने, दगडातील कोरीवकामातून करण्यात आलेले आहे.
हे मंदिर परिसरातील नागरिकांचे ग्रामदैवत मानले जाते. दररोज सकाळी आणि सायंकाळी येथे ग्रामदैवतेची पूजा व आरती केली जाते. दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठ्या उत्साहात यात्रा व उत्सव भरविला जातो. या यात्रेदरम्यान कुस्ती स्पर्धा (दंगल) आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
महाशिवरात्रीच्या दिवशी श्री रामेश्वर मूर्तीची रथातून वाद्य-सुरात मिरवणूक काढली जाते, ज्यामध्ये सुमारे १५ ते २० हजार भक्त सहभागी होतात.
यात्रेदरम्यान कीर्तन, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच हरीनाम सप्ताह यांसारखे धार्मिक उपक्रम आयोजित केले जातात. हरीनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे वाटप केले जाते, ज्याचा लाभ उमराणे व शेजारच्या गावांतील हजारो भक्त घेतात.
या सर्व धार्मिक व सांस्कृतिक परंपरांमुळे श्री रामेश्वर मंदिर हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. शासनाने जर या क्षेत्राकडे अधिक लक्ष दिले, तर हे तीर्थक्षेत्र अधिक विकसित होऊन भक्तांची सोय-सुविधा मोठ्या प्रमाणावर सुधारेल.